श्रीमंत बाजीराव पेशवे

B-A Photo14

बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, इ.स. १७०० – एप्रिल २८, इ.स. १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव किंवा राऊ या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या ऱाऊंनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.

जेमतेम ४० वर्षांच्या आयुष्यात ऱाऊंनी अतुलनिय पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २८ एप्रिल १७४० पर्यंतच्या २० वर्षात त्यांनी अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८),अहमदाबाद(१७३१) उदयपूर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया जिंकल्या होत्या. वेगळ्या शब्दात सांगायचे तर राऊ १००% यशस्वी होते. वेगवान हालचाल हेच त्यांचे प्रभावी हत्यार होते. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर वेगाने झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळू द्यायचा नाही हीच राउंची रणनीती, आपण देखील  “मैदानी लढाई” लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली होती.

मराठ्यांना नर्मदे पलीकडे नेऊन उत्तर दिग्विजय करणारा वीर म्हणून बाजीराव पेशव्यांचे नाव नाव घ्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि बाजीरावांनी त्यावर कळस चढविला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दक्षिणेतील श्रीरंगपट्टणपासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत बाजीरावाने मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली आणला. राजपूत राजांपासून मुस्लिम नबाब आणि शाह्यांना राउंनी नमवले मराठी जरीपटका डौलात उत्तर हिंदुस्तानात फडकविला.

बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल यावर दिल्लीच्या बादशहाचा वजीर फरीदाबादच्या बंगश पठाणांनी हल्ला केला तेंव्हा राजा छत्रसालाने बाजीला पत्र लिहून “जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा “गजांतमोक्षाचा” हवाला देउन बाजीरावांकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेले. ही हालचाल इतकी त्वरेने केली की मराठ्यांच्या फौजा धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावांच्या झंजावातापुढे मोंगल हैराण झाले.

छत्रसालाने यानंतर राउंच्या पराक्रमावर खुष होऊन आपली एक मुलगी ‘मस्तानी’ हिचा रीतसर विवाह राउंबरोबर लावून दिला. इतिहासात पेशवाईचा उल्लेख करताना थोरल्या बाजीरावांचे नाव येते, त्यांना योग्य तो मान दिला जात नाही. ह्या महान योध्याची आपण उपेक्षा केली तरी जगाच्या इतिहासात मात्र तो तितका उपेक्षित राहिला नाही. म्हणूनच अ कन्साईज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर या युद्धशास्त्रावर आधारीत ग्रंथात फिल्ड मार्शल मॉंटगोमरी यांनी जगातील सात लढायांचा उल्लेख केला आहे. त्यात पालखेड (वैजापूर-औरंगाबादजवळ) येथील लढाईचा उल्लेख आहे. या लढाईत राउंनी निजामाला पाणी पाजले होते. या लढाईत अतिशय वेगवान हालचाल करून निजामाला दाती तृण धरायला लावले होते.

बाजीरावांच्या लढाईची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ते एक चांगले सेनापती होते. युद्ध कसे लढावे आणि कुठे लढावे याचे यथायोग्य ज्ञान त्यांच्याकडे होते. घोडेस्वारांचे पथक हि त्यांची मुख्य ताकद होती. त्यांच्याबरोबर सामान अगदीच कमी असे. कुटुंब वा महिला सोबत नसायच्या. रात्री झोपण्यापेक्षा जास्त हल्ला कसा करायच्या याच्या योजना ठरत. शत्रूची रसद तोडणे आणि त्याला होणारा सगळा पुरवठा तोडणे यावर भर दिला जाई. स्वतः बाजीराव घोड्यावरच जेवण करायचे अन घोड्यावरच झोप घेत असत.

२७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून मध्य प्रदेशात नर्मदा नदीच्या किनारी रावेरखेडी येथे २८ एप्रिल १७४० (वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे हा महापराक्रमी पेशवा विषमज्वराने मरण पावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *