अक्षय्य तृतीया

वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय्य या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.तसेच या दिवसापासूनच कृतयुगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते. यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया आणि  परशुराम जयंती साजरी केली जाते, वैशाखातल्या सर्व पर्वाचे, उत्सवांचे केंद्रित रूप म्हणजे अक्षय्य तृतीया. हि तिथी सांस्कृतिक ईतिहासात फार महत्वाची आहे. 

प्राचीन काळात जगणे हि एकच मोठी समस्या होती. अन्न, पाणी आणि निसर्गाच्या प्रकोपापासून बचाव करता येईल असा निवारा शोधत, एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात अशी मानवाची वणवण होत असायची. पण शेतीचा उदय झाला आणि मानवाची वणवण थांबली. झाडाची फळे, त्यातली बीजे, त्यापासून होणारी नवी झाडे आणि त्या झाडांवर परत फळे, हा क्रम त्याच्या ध्यानात आल्यावर कसलीतरी लागवड त्याने करून पहिली, आणि ‘शेती’ चा उदय झाला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचाच होता असे मानले जाते. आज आपल्याला उपलब्ध असलेले प्राचीन वाङ्मय म्हणजे वेद. तथापि, कृषीविद्या कदाचित कालमानाने त्याहि आधीची असावी. 

अक्षय्य तृतीया म्हणजे कृत युगाचा प्रारंभ. म्हणजेच कृती युगाचा प्रारंभ. मानवी संस्कृती खऱ्या अर्थाने येथून आकार घेऊ लागली. संस्कृतीचा पहिला संस्कार म्हणजे शेती. शेतीचा शोध मानवाला लागला आणि त्याची वणवण थांबली. दऱ्याखोऱ्यातून, माणूस मोकळ्या पठारांवर आला, जमीन नांगरून ओंजळभर पेरले तर गाडाभर मिळते, हे त्याला समजले. आणि माणूस शेतकरी झाला. प्राणी मारून त्यांचे मांस खाण्यापेक्षा, त्यांचा उपयोग शेतीसाठी जास्त चांगला होऊ शकतो, हे त्याला कळले. मृत पशूंच्या देहाचे अवशिष्ट वापरून शेतीसाठी खते, अवजारे, संरक्षक आवरणे सारख्या गोष्टी करता येतात हे समजल्यावर माणूस पशु संवर्धन करू लागला. 

” शं नो भव दविपदे शं चतुष्पदे” [‘आम्हा द्विपदाचे आणि चातुष्पदांचे कल्याण कर’ अशी प्रार्थना ऋग्वेदात देखील आढळते.]

अशा तर्हेने संस्कृतीचा विकास होऊ लागला. सुरवातीला शिकार करून जगणारा माणूस शेती करू लागला, पशु संवर्धन करू लागला. माणूस वस्ती करून राहू लागला, त्यातुनच गावखेडी निर्माण होऊ लागली. जेंव्हा माणसाला व्यापार समजला तेंव्हा व्यापारी केंद्रे बनू लागली आणि त्यातूनच मोठी शहरे,  महानगरे अस्तित्वात आली. नवनवीन माध्यमांचा, उपकरणांचा शोध लागू लागला आणि मानवी संस्कृती विस्तारू लागली. माणसाची हि प्रगती कोणी थांबवू शकणार नाही, पण जर ह्या मानवी संस्कृतीच्या आरंभाकडे पहिले तर आजच्या दिवसाचे “अक्षय्य तृतीये” चे महत्व जाणवल्याशिवाय राहणार नाही. जेंव्हा मानवाने, शेतीद्वारे आपल्या अन्नाची सोय केली, तेंव्हाच त्याने, पृथ्वीवरील आपले अस्तित्व ‘अक्षय्य’ केले. अजूनही अक्षय्य तृतीयेला नवीन वर्षाच्या शेतीचा शुभारंभ करण्याची पद्धत आहे. माणसाने कितीही प्रगती केली, नवनवीन शोध लावले, चंद्रावर, मंगळावर पोहोचला तरीही पोटाची खळगी भरायला अन्नच लागते, त्याला पर्याय नाही. म्हणजेच शेतीला पर्याय नाही. 

साडेतीन मुहूर्तातील हा अर्धा मुहूर्त मानला जातो. ह्या दिवशी केलेली कामे चिरंतन होतात, संकल्प सिद्धीस जातात, असे म्हणतात, म्हणून  ‘सर्वेपि सुखिन: सन्तु । सर्वे सन्तु निरामया । सर्वे म्रदाणि पश्यन्तु । मा कश्चिद दु:खमाप्नुयात ।।’ अशी प्रार्थना करतो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *