वेद आणि विज्ञान – १

आपल्या संस्कृतीतील अनेक गोष्टींकडे पुराणातील वांगी (वानगी) म्हणून,दुर्लक्ष करण्याची प्रथा बोकाळलेली आहे. आजच्या विज्ञानाला ठाऊक झालेल्या काही गोष्टी, वेद पुराणांमधून उल्लेखलेल्या आहेत असे म्हंटले कि लगेच समोरून थट्टेचा, कुचेष्टेचा सूर लागतो. अर्थात त्यामध्ये टीका करणाऱ्यांचा संपूर्ण दोष आहे असेही म्हणता येत नाही. वेद, उपनिषदे, पुराणे ह्यांच्याकडे फक्त धर्मग्रंथ म्हणूनच पहिले गेले. त्यात सांगितलेल्या अनेक गोष्टींमागे काहीतरी वैद्यानिक कारण असेल असा विचार सहसा कोणी करत नाही. मध्यंतरी काही सुहृदांबरोबर झालेल्या चर्चेतून ह्या संदर्भात अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्याचबरोबर काही मौलिक ग्रंथ देखील अभ्यासासाठी मिळत गेले. संशोधन करणे, संदर्भ मिळविणे, संकलन करणे, चिकित्सक अभ्यास करणे, विश्लेषण करणे अशा मार्गांनी ज्ञानवृद्धी होत असते; ह्याच पद्धतीने मिळत गेलेल्या लेखांचा, ग्रंथांचा अभ्यास करून, हा विषय संक्षिप्त रुपात मांडत आहे. वेदांमधून जे ज्ञान मिळते ते फार प्राचीन आहे. हजारो वर्षांपूर्वी पासूनचा हा वारसा आहे. हा वारसा जपला पाहिजे, जोपासला पाहिजे एवढीच माझी धारणा आहे. 

वेदातील विज्ञानाचा शोध घेताना गणित, धातूशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान शास्त्र आणि आयुर्वेद ह्यासंदर्भात जी माहिती मिळाली आणि जी माझ्या अल्पमतीला समजली असे मला वाटते ती ह्या लेखमालेतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. 

काही हजार वर्षांपूर्वी, उपनिषदांच्या रूपाने छंदोबद्ध रचनांमधून वेदांमधील ज्ञान समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवले. ज्ञान समाजात खोलवर पोहोचले त्यामुळे लोकं नीतिनियमाने, धर्माने वागू लागली पर्यायाने सर्वत्र सुख शांती नंदू लागली.

सर्वेपि सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामयाः || सर्वे भद्राणि पश्यन्तु | मा कश्चित दुःखमाप्नुयात् ||

भारतीय प्राचीन वाङ्मयात ज्ञानाचे भांडार आहे. पाणिनी ह्यांनी लिहिलेला, भाषेला व्याकरणाचे नियम असतात हे समजावून देणारा पहिला ग्रंथ आहे; पदार्थ विज्ञान शास्त्र आहे; रसायन शास्त्र आहे; मापनाच्या कोष्टकांनी भरलेले अंकगणित आहे, ज्यामुळे विज्ञानाचा अभ्यास सोपा झाला, प्रचंड मोठ्या संख्या सोप्या पद्धतीने लिहिता येऊ लागल्या, बीजगणित, रेखागणिता सारख्या गणिती शास्त्रांचा विकास झाला. ह्या सर्व गोष्टी वेद, उपनिषदे, पुराणे, अरण्यके, ब्राह्मणके इत्यादी ग्रंथातून सोप्या काव्यमय भाषेत मांडलेल्या आहेत. 

(क्रमशः) 

1 2