जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने

गेले २-३ दिवस वूमन्स डे साठी शुभेच्छा देणारे बरेच “मेसेज” आणि पोस्ट्स वाचण्यात आल्या. आणि मग एक प्रश्न नेहमी प्रमाणे सतावू लागला, ‘आपल्या देशात हे असे कुठले तरी दिवस साजरे करणे कितपत संयुक्तिक आहे?’  सध्याच्या काळात ‘वूमन्स डे’ म्हणजे एक विनोदच आहे. एकीकडे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढते आहे, देशाच्या राजधानीत महिला सुरक्षित नाहीत, देशात बलात्काराचे प्रमाण वाढते आहे, अगदी १ – २ वर्षांच्या कोवळ्या मुलींवर बलात्कार होत आहेत आणि दुसरीकडे महिला दिन साजरा केला जातोय. किती परस्पर विरोधी गोष्टी आहेत ह्या. ह्याचा नीट विचार व्हायला नको का?

“वूमन्स डे” सारखेच ‘मदर डे’, ‘फादर डे’, ‘फ्रेडशिप डे’  असे अनेक ‘डे’ आहेत. मला तर मदर डे किंवा फादर डे म्हटले की आई वडिलांच्या श्राद्धाचा दिवस आठवतो. अजूनही आपल्याकडे वृद्ध आई वडील आपल्या मुलाबाळांबरोबर राहतात, आणि मुलेसुद्धा त्यांची काळजी घेत असतात. मला माहित आहे की काळ   बदलत आहे, वृद्धाश्रमांची संख्या आणि तिथे दाखल होणा-यांची संख्या हळूहळू वाढत आहे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण तर ह्याला कारणीभूत नसेल ना? हे असले मदर डे फादर डे साजरे करणे म्हणजे, आधी आई-वडिलांपासून दूर रहायचे किंवा त्यांना वृद्धाश्रमात ठेवायचे, वर्षभर ते कसे आहेत ह्याची चौकशीपण करायची नाही आणि एक दिवस त्यांना फुले द्यायची शुभेच्छा द्यायच्या भेटवस्तू द्यायच्या, ह्याला खरेच काही अर्थ आहे का हो?

माझा काही हे असले दिवस साजरे करण्याला विरोध नाहीये. तसा विरोध करणारा मी कोण म्हणा? एखाद्या गोष्टीला विरोध करणे किंवा नंतर परत त्याच गोष्टीला पाठींबा देणे हे सगळे करायला कुठलाही राजकीय पक्ष समर्थ आहे.

आज ह्या जागतिक महिला दिना निमित्त सगळ्या पुरुषांना एक विनंती आहे की महिलांना रोज भलेही शुभेच्छा देऊ नका, नमस्कार करू नका पण त्यांचा मान मात्र नक्की राखा. त्यांचा आदर करायला शिका. पोटच्या मुलीला ओझं समजू नका. तिला चांगले शिक्षण द्या, कर्तुत्ववान बनवा. तिचे “एकदाचे लग्न लावून” मोकळे होऊ नका तर तिच्या लग्नानंतरही तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. आणि एक महत्वाचे, तुम्हाला एकवेळ, द्रौपदीची लाज राखणारा श्रीकृष्ण होता आले नाही तरी चालेल पण स्वतःचा कधी दुःशासन होऊ देऊ नका.